नव्या वर्षात बर्फात अडकून ॲव्हेंजर फेम अभिनेता गंभीर जखमी, अनिल कपूर यांनी व्यक्त केली चिंता…


मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनर याचा रविवारी जीवघेणा अपघात झाला. या अपघातामध्ये जेरेमी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घराबाहेर साचलेला बर्फ काढत असताना ही दुर्घटना घडली. जेरेमी याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे.

Reno Gazette Journal यांनी दिलेल्या माहितीनुसार नेवादा इथल्या रेनो मध्ये जेरेमी याचं घर आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधी इथं तुफान बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे उत्तर नेवादा भागातील ३५ हजार घरांमधील विद्युत पुरवठा बंद झाला होता. त्याचवेळी जेरेमी त्याच्या घराबाहेर साचलेले बर्फ काढत होता. त्यावेळी झालेल्या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले.


जेरेमीच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. जेरेमी रेनर मनोरंजन विश्वामध्ये खूप लोकप्रिय आहे. जेरेमीनं ॲव्हेंजर्स सीरीज, कॅप्टन अमेरिका यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. हे सिनेमे भारतातही प्रदर्शित झाल्यामुळे इथंही त्याचे चाहते आहेत. जेरेमीला झालेल्या अपघाताबद्दल चाहत्यांना समजलं तेव्हा त्यांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

हे वाचा-‘…अन् गोडसेचा आवाज दाबण्यात आला’, सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षक म्हणाले- दमदार!

अनिल कपूरबरोबरही केलंय काम

जेरेमी गेल्यावर्षी भारतात आला होता. त्यावेळी अनिल कपूरबरोबरचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनी मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल मध्ये काम केलं होतं. अनिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली आहे. त्यांनी जेरेमीसोबत फोटोही शेअर केला आहे. दरम्यान जेरेमी या सीरिजनंतर तो 28 Weeks Later आणि ‘अमेरिकन हसल’ सिनेमातही दिसला होता.

ऑस्करसाठी दोनवेळा नामांकन

जेरेमीला ऑस्कर पुरस्कारांसाठी दोन वेळा नामांकन झालं होतं. २०१० मध्ये त्यानं द हर्ट लॉकर सिनेमात केलेल्या कामासाठी सर्वोत्तम अभिनेता या विभागासाठी नामांकन मिळालं होतं. तसंच द टाऊन सिनेमात सर्वोत्त सहाय्यक अभिनेता म्हणूनही ऑस्करसाठी नामांकन झालं होतं. जेरेमी रेनर सध्या Mayor of Kingston मध्ये काम करत आहे. ही मालिका पॅरामाऊंट प्लसवरून प्रसारित होत आहे.





Source link

Leave a Reply