बाळासाहेबांनंतर या फायरब्रँड नेत्यावर सिनेमा घेऊन येणार संजय राऊत; ‘मटा कॅफे’मध्ये केली घोषणा


मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या ‘मटा कॅफे’मध्ये उपस्थिती दर्शवली होती. त्यांनी या कार्यक्रमात विविध राजकीय विषयांवर दिलखुलास गप्पा तर मारल्या, याशिवाय काही वैयक्तिक आणि सामाजिक विषयांवरही भाष्य केले. तर सिनेरसिकांसाठीही एक महत्त्वाचे अपडेट राऊत यांनी दिले. संजय राऊत लवकरच महाराष्ट्रा आणि देशाच्या राजकारणात मोठा वाटा असणाऱ्या एका नेत्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट घेऊन येणार आहेत.

नव्या सिनेमाविषयी काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांना यावेळी असा प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘ठाकरे’ सिनेमाच्या निर्मितीनंतर आता भविष्यात अशा कोणत्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार आहे का? असल्यास विषय काय असेल? यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी असे सांगितले की, ठाकरे सिनेमाच्या दुसरा भागाचीही निर्मिती केली जाईल. यावेळी ते म्हणाले की, ‘जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचे काम जवळपास संपत आले होते. पण मधल्या काळात आमच्यावर संकट आल्याने ते थांबले आहे. पण मी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सिनेमा काढणार. कारण नवीन पिढीला बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस या नेत्यांनी आयुष्यात काय केले हे समजायला हवे. सलमान खान-शाहरुख आहेतच पण आमचे नेते हे होते’.

हे वाचा-इरफान यांच्या निधनाने पुरता खचलेला बाबिल; ४५ दिवस स्वत:ला खोलीत घेतलं कोंडून

दरम्यान जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार किंवा यामध्ये कोणत्या कलाकारांना कास्ट केले जाईल याविषयीची माहिती समोर आलेली नाही. याशिवाय ठाकरे २ हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळीही लगावली. ठाकरे २ बद्दल बोलताना ते असं म्हणाले की, ‘हा सिनेमा येणारच आहे, जर एकनाथ शिंदेंवर सिनेमा येऊ शकतो, धर्मवीर नावाचा तर.. हा सिनेमा आनंद दिघेंवर नव्हता तर त्यांच्यावरच होता हे नंतर कळलं.’

इथे पाहा संजय राऊत यांची प्रतिक्रिया –

कोण होते जॉर्ज फर्नांडिस?

कामगार नेते ते देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते अशी ओळख निर्माण करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर जनतेने विशेष प्रेम केले. एक काळ असा होता की त्यांच्या एका आवाहनानंतर संपूर्ण मुंबई थांबायची. त्यांच्यामागे मोठा कामगार वर्ग होता. ०३ जून १९३० साली फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटकमध्ये मंगळुरू याठिकाणी झाला होता. १९४९ साली ते कामाच्या शोधात मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. केंद्रीय नेते, राजकारणी आणि पत्रकार जॉर्ज फर्नांडिस जनता दलाचे प्रमुख सदस्य होते. १९९४ मध्ये त्यांनी जनता दल सोडून समता पक्षाची स्थापना केली. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी रेल्वे, उद्योग, संरक्षण, दळणवळण अशी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.

संजय राऊतांनी उर्फीच्या विषयावर बोलणं टाळलं

सध्या राज्यात उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ या विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या विषयावर राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. यावर ते म्हणाले की, ‘२०१४ पासून राजकारणात हेच चालू आहे की एखाद्याला पकडायचं आणि लक्ष्य करायचं. मग तो अभिनेता असेल किंवा अभिनेत्री. त्याची जात, धर्म, पंथ यावरुन टारगेट करायचं.’



Source link

Leave a Reply