हा सलमान ती भाग्यश्री, ही तर ‘मैंने प्यार किया’ची कॉपी; ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेचा लेखक ट्रोल
मुंबई- गेल्या काही आठवड्यांपासून ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं कथानक आणि मालिकेचे कलाकार दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच काहीच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली. मात्र आता ही मालिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकाची प्रेक्षक खिल्ली उडवताना दिसतायत. इतकंच नाही तर या हे कथानक सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाची कॉपी असल्याचं म्हणत कावेरीला भाग्यश्री तर राजला सलमान म्हणत आहेत.

मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेल्या कथेनुसार, राज आणि वैदेहीच्या लग्नाच्या दिवशी कावेरीला खरं माहीत पडल्याने ती त्यांचं लग्न थांबवते. त्यानंतर कावेरी स्वतःच्या प्रेमाची कबुली देते. राज आणि रत्नमाला कावेरीला मागणी घालण्यासाठी गुहागरला जातात. मात्र तिचे तात्या राज आणि कावेरीच्या लग्नाला नकार देतात. यापुढे तात्या लग्नासाठी राजसमोर एक अट ठेवतात ती म्हणजे त्याने आईची सर्व संपत्ती सोडून गावाला राहायला यावं आणि स्वकमाईवर जगून दाखवावं. राजही ही अट मान्य करतो आणि गावातच राहायचं ठरवतो. आता राज तिथेच राहून आपल्या प्रेमाची परीक्षा देणार आहे. ही संपूर्ण कथा सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील आहे. त्यामुळे प्रेक्षक लेखकाला काहीतरी नवीन लिहिण्याचा सल्ला देतायत.

एका युझरने लिहिलं, ‘अरे काहीतरी नवीन लिहा रे’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘काय हे याशिवाय दुसरं काही सुचत नाही का’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘अरे रमय्या वास्तमैया’ ची कथा चोरली आहे लेखकाने. प्रेक्षकांना काय समजता. काही दुसरं नवीन लिहा.’ या सहज असलेल्या कथानकामुळे मालिका आता ट्रोल होतेय.

Source link

Leave a Reply