महिन्याला किती कमावतो? चाहत्याच्या प्रश्नाला किंग खान शाहरुखनं असं काही उत्तर दिलं की… होतेय त्याचीच चर्चा


मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. AskSRK या हॅशटॅगनं शाहरूखचं चाहते त्याला हवे ते प्रश्न विचारत असतात. बुधवारी शाहरुखनं #AskSRK हे सेशन ट्विटरवरील चाहत्यांसाठी ठेवलं होतं. या सेशनमध्ये शाहरुखच्या असंख्य चाहत्यांनी त्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. चाहत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची शाहरुखनं त्याच्या खास अंदाजामध्ये उत्तर दिली.

एका चाहत्यानं शाहरुखला थेट महिन्याची कमाईच विचारली. यावर किंग खाननंही त्याला शोभेल असंच उत्तर दिलंय. त्याच्या या उत्तरानं पुन्हा एकदा त्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एका युझरनं विचारलं की, एका महिन्यात किती कमावतोस? यावर शाहरुख म्हणाला की, ‘प्रत्येक दिवसाला अगणित प्रेम कमावतोय’. शाहरुखच्या या उत्तराची सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही त्यानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला होता. तेव्हाही त्यानं अशी हटके उत्तरं दिली होती. आणखी एका उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. एका चाहत्यानं त्याला विचारलं होतं की, ‘जर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या मित्राबरोबर डिनरसाठी जाता, तेव्हा तुम्ही जेवणाचं बिल अर्ध भरता की संपूर्ण बिल तुम्हीच भरता?’ या प्रश्नावरही शाहरूख खानने मजेशीर उत्तर दिलं. ‘प्रसिद्ध असणं किंवा नसणं याच्याशी त्याचा काहीच संबंध नसतो. पण बिल तेच भरतात. कारण मी खिशात पैसे घेऊन कुठेच जात नाही.’

कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पठाण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालं आणि तेव्हापासून वाद सुरू झाला. या गाण्यातील दीपिकाचे कपडे, दीपिका-शाहरुखमधील इंटिमेंट सीन आणि एका शॉटमध्ये दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी या गोष्टींमुळे मोठा वादंग उठला. सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जातेय. एवढेच नव्हे तर शाहरुख-दीपिकाला जीवे मारण्याची धमकीही मिळाली. या परिस्थितीत शाहरुखचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



Source link

Leave a Reply