‘पठाण’वरही बॉयकॉटचं सावट
‘बेशरम रंग’ गाण्यातील शाहरुखचे अॅब्स आणि दीपिकाचा बोल्ड लूक यावर एकीकडे त्यांचे चाहते फिदा आहेत, तर दुसरीकडे या गाण्याला विरोध होतोय. यामधील दीपिकाचा रीव्हिलिंग लूक अनेकांना आवडलेला नाही. या दोघांच्या इंटिमेट सीनवरही अनेकांनी आक्षेप घेतला. गाण्याच्या रीलिजनंतर सोशल मीडियावर #BoycottPathan आणि #BoycottbollywoodCompletely असे हॅशटॅगही ट्रेंड केले गेले.
भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसवरुन वाद
‘बेशरम रंग’ या गाण्यातील एका सीनमध्ये दीपिकाने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिच्या या रीव्हलिंग ड्रेसवर आता हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते हा भगवा रंग असून पठाण सिनेमातील गाण्यात त्याचा अपमान झाला. पठाणमध्ये झालेला भगव्या रंगाचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही. त्यांनी असे म्हटले की या सिनेमात भगव्या रंगाचे कपडे अश्लिल पद्धतीने परिधान केलेत आणि ‘बेशरम रंग’ हे गाणे बनवले आहे.
’हा हिंदू सनातन धर्माचा अपमान’
चक्रपाणी महाराज यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, हा भगव्याचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. बॉलिवूड सनातन धर्माविरोधात काम करत आहे. दुर्भाग्याची बाब म्हणजे ज्या भगव्याने देश आणि जगाला दिशा दिली त्यालाच बेशरम रंग म्हटले जातेय. सेन्सॉर बोर्डाने हे गाणं पास करणं आणि हिंदू सनातन धर्माचा अपमान होणं हे अधिक दुर्भाग्यपूर्ण आहे. चक्रपाणी महाराजांनी हिंदू समाजाला या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. आजतकने याविषयी वृत्त दिले आहे.
‘मध्यप्रदेशात प्रदर्शित होऊ देणार नाही सिनेमा’
दरम्यान मध्य प्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही या गाण्याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी असा इशारा दिला की या गाण्यातील दीपिकाने परिधान केलेले कपडे आणि काही दृश्य बदलली नाहीत तर ते त्यांच्या राज्यात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाहीत. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘पठाणमधील गाण्यात टुकडे-टुकडे गँगची समर्थक दीपिका पादुकोणची वेशभुषा आक्षेपार्ह आहे आणि हे गाणे दुषित मानसिकतेने बनवण्यात आले आहे. त्यांनी थेट सिनेमाला प्रदर्शित होण्याला विरोध करण्याचा इशाराच दिला आहे.
‘पठाण’वर बहिष्कार टाकला जाण्याची आणखीही काही कारणं
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाला बॉयकॉट करण्याची आणखीही काही कारणं नेटकरी सोशल मीडियावर शेअर करतायंत. या गाण्यात दीपिका-शाहरुख यांनी केलेला एक हाताचा इशाराही नेटिझन्सना आवडलेला नाही. त्यावरुन इस्लामीकरण केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला गेला. अश्लिलतेचं प्रदर्शन केल्याचा आरोप या गाण्यावर आणि सिनेमावर होतोय. पठाण बॉयकॉट करण्याचं आणखी एक कारण म्हणजे शाहरुखला आर्यन खानवरुन ट्रोल केलं जातं आहे. तो नेपोटिझम आणि ड्रग या दोन्ही गोष्टींना पाठिंबा देत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.
जबरा फॅन्सची ‘बेशरम रंग’ला पसंती
‘बेशरम रंग’ या गाण्यात शाहरुख-दीपिकामध्ये इंटिमेट डान्स दाखवला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख फ्लाँट करत असलेले अॅब्स त्याच्या चाहत्यांना आवडले असून दीपिकाचा बोल्डनेसही आवडला. जरी विरोध होत असला तरी या दोन्ही कलाकाराचे चाहते त्यांंना पाठिंबा देतायंत. विशाल-शेखरचे संगीत असणारं हे गाणं शिल्पा राव, कॅरालिसा मोंटेइरो आणि विशाल-शेखर यांनी गायलं असून वैभवी मर्चंट या प्रसिद्ध कोरिओग्राफरने नृत्य दिग्दर्शन केले आहे.