kadar khan
२५० हून अधिक चित्रपटांसाठी लिहिले संवाद
कादर खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि २५० हून अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले. त्यांना पद्मश्रीसह अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये खूप लोकप्रियता कमावली आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य दिलं, परंतु त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र गरिबीत गेलं. कादर खान यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल येथे झाला होता, परंतु आपल्या मुलाचा मृत्यू होऊ शकतो या भीतीने त्यांचे पालक भारतात आले होते. कादर खान यांच्या आधी त्यांच्या आई वडिलांना ३ मुलगे झाले. मात्र तिघेही वयाच्या ८ व्या वर्षी निधन पावले. अशा स्थितीत कादर यांच्या आई-वडिलांना भीती वाटत होती की, त्यांच्यासोबतही असं होऊ शकतं. यानंतर कादर खान आणि त्यांचं कुटुंब भारतात आलं आणि मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात राहू लागले.
आईचे बळजबरीने दुसरे लग्न, नवरा करत होता अत्याचार
कादर खान यांच्या आई- वडिलांमध्ये सर्व काही ठीक नव्हतं. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. कादर खान तेव्हा खूप लहान होते. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आईने कादर यांना मोठ्या अडचणींचा सामना करत वाढवलं. कादर यांच्या आईला बळजबरीने दुसरं लग्न करायला भाग पाडलं गेलं. आईचं ज्याच्याशी लग्न झालं तो माणूस खूप भांडायचा आणि शिवीगाळ करायचा. तो कादर यांना त्यांच्या खऱ्या वडिलांकडे जाऊन पैसे मागायला सांगायचा. आईच्या मदतीसाठी आणि उदरनिर्वाहासाठी कादर यांना लहानपणापासूनच भीक मागावी लागली. ते डोंगरी येथे जाऊन मशिदीबाहेर भीक मागायचे आणि जे काही पैसे मिळायचे त्यातून दोन वेळची भाकरी मिळायची.
स्मशानात भीक मागून, मिमिक्री करून जगले
ज्या वयात मुलं शिकतात आणि खेळतात तेव्हा कादर खान कामावरही जायचे आणि भीकही मागायचे. पण आपल्या मुलाने शिक्षण घ्यावे अशी आईची इच्छा होती. त्यामुळे तिने त्यांना शाळेत दाखल केलं आणि नमाजसाठी पाठवायला सुरुवात केली. कादर खान यांना लहानपणापासूनच मिमिक्रीची आवड होती. त्यामुळेच ते शाळा बुडवून स्मशानात पोहोचायचे आणि तिथे बसून स्वतःशीच बोलायचे, चित्रपटांचे संवाद बोलायचे आणि कलाकारांची नक्कल करायचे. या छंदाने त्यांना चित्रपटांमध्ये आणलं. त्यांनी मिमिक्रीच्या छंदासोबतच आपलं शिक्षण पूर्ण केलं.
दिलीप कुमार यांनी दिलेली चित्रपटात संधी
मुंबईतील इस्माईल युसूफ महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आणि नंतर एका महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. एकदा ते कॉलेजमध्ये शिकवत असताना दिलीप कुमार यांचा फोन आला आणि त्यांनी कादर खान यांचं नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कादर खान यांनी मान्य केलं. त्यांचं नाटक पाहिल्यानंतर दिलीप कुमार यांनी त्यांना चित्रपटात संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कादर खान हे नाव पुढे प्रचंड लोकप्रिय झालं.
अमिताभ आणि गोविंदासोबत केले अनेक चित्रपट
कादर खान यांनी १९७३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर अनेक चित्रपटात काम केलं. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कालिया’, ‘कुली’ आणि ‘शहेनशाह’ या चित्रपटांसह तब्बल २१ चित्रपटांमध्ये काम केलं. गोविंदासोबत कादर खान यांची चांगली जोडी जमली आणि दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. ते काही वर्षे चित्रपट जगतापासून दूर राहिले आणि कॅनडात स्थायिक झाले. तेथे ३१ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.
कादर खान यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व होणं नाही
कादर खान यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व कधीही होणं नाही. कॉमेडी असो वा खलनायक, त्यांनी प्रत्येक पात्र जिवंत केलं. आजही लोक त्यांचे चित्रपट मोठ्या आवडीने पाहतात. हे ९० चं दशक होतं तेव्हा कादर खान यांचं चित्रपटांमध्ये असणं हा हिटचा समानार्थी शब्द मानला जात होता. आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात ते जिवंत आहेत. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो हे कादर खान यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलं.