पानशेत धरणग्रस्तांच्या मदतीसाठी गेटवर पदर पसरून उभ्या राहायच्या माई; तरीही पैसे कमी पडले म्हणून…


sulochana chavan life facts ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’, ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या अजरामर करणाऱ्या जेष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी आज १० डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कित्येक लावण्या त्यांनी त्याच्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. त्याकाळी लावणी आणि सुलोचना चव्हाण असं समीकरणच बनलं होतं. माई कित्येक गरजू व्यक्तींना सढळ हाताने मदत करत. त्यांच्या दानशूर पणाचे किस्से ऐकून अनेक लोक दुरून त्यांच्याकडून मदत मागण्यासाठी येत. आपल्याकडे पैसे नसतानाही माई कार्यक्रम करून दुसऱ्यांची मदत करत. पानशेत धरण फुटल्यावर तिथल्या लोकांसाठीही माईंनी मदतीचा हात दिला होता. वेळप्रसंगी त्या धरणग्रस्तांसाठी पदर पसरून उभ्या राहिल्या. वाचा त्यांच्या दानशूरपणाचे काही किस्से.

sulochana chavan

आवाजाच्या जोरावर मिळवला वेगळेपणा

आपल्या खड्या आवाजाने कार्यक्रम गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला. त्यांनि कोणत्याही गुरुशिवाय आणि शिकवणीशिवाय सुरुवातीला संगीत कलेची साधना केली आजतागायत खर्जा आवाजात लावणी गाण्यात त्यांचा हात कुणीही पकडू शकलेलं नाही. त्यांनी आपल्या आवाजानेच स्वतःचा वेगळा दर्जा निर्माण केला. त्यामुळेच त्या सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. त्यांच्या गायनातील कारकिर्दीच्या प्रवासामध्ये त्यांना सन १९६५ मध्ये त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्कार मिळाला.

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच गायनाची सुरुवात

त्यांनी लहानपणी अभिनय क्षेत्रापासून आपल्या कारकीर्दीलासुरुवात केली. सुलोचना कदम हे त्यांचं माहेरचं नाव. त्यांचं शालेय शिक्षण चौथीपर्यंत झालं. त्यांनी लहानपणी जत्रेमधून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या उर्दू नाटकांमध्ये मजनूचीही भूमिका करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गाणी गायला सुरुवात केली. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. हा मराठीतील त्यांचा पहिला चित्रपट होता.

स्वतःच्या मुलाला दुसरीकडे ठेवून करायच्या दौरे

सुलोचना चव्हाण यांनी ६० वर्षे विदर्भ, खानदेश, मराठवाडा येथे शाळा, महाविद्यालय, देऊळ, अनाथाश्रम, यांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. इतकंच नाही तर इतरांना मदत मिळावी म्हणून त्या स्वतःच्या लहान मुलांना इतर कुणाकडे ठेवून दहा-दहा दिवस दौऱ्यावर जायच्या. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आजारपणाचीही मुळीच पर्वा केली नव्हती. लावणीसम्राज्ञीच्या प्रवासाला लाभलेला हा आणखी एक खराखुरा वेगळा पैलू होता. त्यामुळेच लोक त्यांच्याकडे हक्काने मदत मागायला येत.

रस्त्यावर पदर पसरून उभ्या होत्या माई

त्यांनी नांदेड येथे डॉ. भुसारी यांच्या कुष्ठधाम रुग्णालयासाठी लागणाऱ्या प्लास्टिक सर्जरीच्या यंत्रणेसाठी दहा कार्यक्रम करून नऊ लाख रुपये मिळवून दिले होते. पुण्याच्या पानशेत धरणफुटीच्या वेळीही त्यांनी कार्यक्रम केले. धरणग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी ठराविक रक्कम सरकारला देण्याचं ठरवलं. परंतु, कार्यक्रमानंतर ठरवलेली रक्कम पूर्ण झाली नाही त्यामुळे त्या गेटवर पदर पसरून उभ्या राहिल्या आणि लोकांकडे मदत मागितली. तरीही पैसे कमी पडले म्हणून त्यांनी स्वतःचे दागिने विकून ही रक्कम पूर्ण केली.

आईच्या मृत्यूनंतरही केला होता कार्यक्रम

नागालँड येथे झालेल्या अंतर्गत युद्धाच्या वेळीही त्यांनी भारतीय लष्कराच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची खंबीर साथ होती. त्यांच्या आईचे सन १९६० मध्ये निधन झाले. मात्र तरीही शाळेतील मुलांच्या मदतीसाठी त्यांनी आईच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी जड अंतकरणाने कार्यक्रम केला होता. त्यांची ही वृत्ती चाहत्यांना प्रचंड भावली होती. माईंनी आजवर अनेक गरजू व्यक्तींना सढळ हाताने मदत केली होती. २८ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊ केला. आता त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply