शिवरायांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं, आणि हा पाहा.. अक्षयचा तो व्हिडिओ पाहून नेटकरी पुन्हा संतापले


मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासानं मनोरंजनसृष्टीला नेहमीच भुरळ घातली आहे. आजवर टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये महाराजांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्यापासून महेश मांजरेकर, डॉ. अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, शंतनू मोघे, शरद केळकर, भूषण प्रधान, सुबोध भावे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. आता या पंगतीत अभिनेता अक्षय कुमारही बसला आहे.

महेश मांजरेकरदिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षयनं मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा होणं सहाजिकच होतं.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच वादाला तोंड फुटलं आहे. शिवरायांची भूमिका अक्षय साकारणार हे समजल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्याचा लुक समोर आल्यानंतरही प्रेक्षकवर्ग नाराजच दिसून येत आहेत. बहुतांश लोकांना अक्षयचा हा लुक आवडला नाही, त्यांनी तशी कारणंही सांगितली आहेत. अजूनही प्रेक्षकांना महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय हा योग्य अभिनेता नाही असंच वाटत आहे.


एकानं म्हटलंय, महाराजांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं, पण हा कुपोषित दितोय, तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं की, फक्त मेकअप करून महाराजांची भूमिका साकारू शकत नाही. तर आणखी एकानं लिहिलं की, हा तर आमच्या महाराजांचा अपमान. अशा अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

राज ठाकरेंमुळं साकारली भूमिका
मराठीत काम करण्यासाठी मी वाट पाहत होतो. या चित्रपटाच्या निमित्तानं हे स्वप्न पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका मी करावी, असं राजसाहेब ठाकरे यांनी मला सुचवलं. शिवाय मला महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करायचंच होते. त्यांचे चित्रपट मी पाहत असतो. माझ्यापरीनं मी माझे सर्वस्व या भूमिकेला देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं अक्षयनं म्हटलंय.

दरम्यान, पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर याच चित्रपटातील सात मावळ्यांची वेषभूषाही वादात सापडली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटातील कलाकारांचे छायाचित्र दाखवून ‘त्यांचा पोषाख पाहिल्यानंतर हे काय मावळे वाटतात का, असा प्रश्न पडतो असं म्हटलं होतं. चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शकाला कौतुकाची थाप देईन; पण इतिहासाची मोड तोड केली तर गाठ माझ्याशी आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.





Source link

Leave a Reply