Throwback 2022: कुणी काय गमावलं, काय कमावलं ? कसं होतं तुमच्या लाडक्या कलाकारांचं सरतं वर्ष


प्रेक्षकांचं प्रेम आणि पुरस्कार

मी अनेक वर्षं इंडस्ट्रीत काम करीत आहे. त्यामुळे या वर्षानंच नाही; पण गेली अनेक वर्षं एक कलाकार म्हणून मी बऱ्याच गोष्टी शिकले. मला माझ्या कामानं माणूस म्हणून घडवलं. कलाकार म्हणून जगताना चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव येत असतात. अशा वेळी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे कळणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या कामातून लोकांना मिळणारा आनंद खूप समाधान देऊन जातो. या वर्षात मला अनेक पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप आहे आणि ही थाप, प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे.

– श्रेया बुगडे

​संयम शिकवला

या वर्षानं मला भरभरून दिलं. ‘पांडू’ या सिनेमापासून प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’, ‘रानबजार’ अशा विविध कलाकृतींमध्ये लक्षवेधी भूमिका करायला मिळाल्या. ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या वर्षानं संयम शिकवला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देऊन गेला.

– प्राजक्ता माळी

​खंबीर बनवलं

गेल्या अनेक वर्षांपेक्षा हे वर्षं थोडं कठीण होतं. एकीकडे वैयक्तिक आयुष्यातला कठीण काळ आणि दुसरीकडे ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतली वल्लीची भूमिका अशा दोन्ही स्तरांवर मी लढत होते. या सगळ्यामुळे मी खूप खंबीर झाले. आम्ही कलाकार आहोत, आमची एक इमेज असते; पण जेव्हा या सगळ्या गोष्टी वैयक्तिक आयुष्यापर्यंत येऊन थांबतात तेव्हा मी आधी माझ्या जवळच्या माणसांचा विचार करते आणि करत राहीन. आपल्याला मोठ्या अडचणीतून वाट सापडणं ही माझ्यासाठी सर्वांत खास गोष्ट होती. याहून दुसरं आनंदादायी काहीच असू शकत नाही.

– अभिज्ञा भावे

​चांगलं काम करण्याचा निर्धार

गेल्या वर्षी मी ‘अनाहत’ या नावाची कंपनी सुरू केली; पण तिचा विस्तार खऱ्या अर्थानं यावर्षी झाला. गेल्या वर्षी निर्मिती, दिग्दर्शन, लेखन असं सगळं सुरू केलं असलं, तरी या वर्षात मी लिहिलेल्या दोन संहितांची एनएफडीसी आणि फिल्म बझारमध्ये निवड झाली. त्यामुळे एक वेगळा अनुभव मिळतोय. सगळं शून्यातून सुरू करत आहे. थोडं दडपण, धाकधूक असतेच. पुढं जाण्याची इच्छाच तुम्हाला अजून छान काम करायला बळ देते हे ही तितकंच खरं आहे. या वर्षाप्रमाणेच नववर्षात चांगलं काम करत राहायचं, असं ठरवलं आहे.

– अंजली पाटील

​स्वतःची काळजी घ्या

आपण सगळेच एका मोठ्या संकटातून बाहेर पडलो. त्यातून दोन महत्त्वाच्या गोष्टी मला जाणवल्या; त्या म्हणजे माणुसकी आणि स्वतःची जास्तीत-जास्त काळजी घेण्याचं महत्त्व. एकमेकांविषयी असलेली नाराजी, मत्सर सगळं टाळा. तुमच्या नशिबात असेल तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. स्पर्धा ही स्वतःशी आहे. या वर्षात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. मी काम करत असलेल्या ‘स्वाभिमान’ या मालिकेचेदेखील लवकरच ६०० भाग पूर्ण होणार आहेत. माझी कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे मिळालेलं यश आणि प्रेक्षकांचं प्रेम अशा अनेक गोष्टी या वर्षानं मला दिल्या आहेत.

– अशोक शिंदे

​प्रत्येक क्षण जगावा

या वर्षात खूप छान काम करता आलं. ‘लोच्या झाला रे’, ‘दे धक्का २’, ‘तमाशा लाइव्ह’, ‘बालभारती’ आणि आता ‘सर्कस’ अशा विविध धाटणीच्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारता आल्या. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. ‘आता होऊ दे धिंगाणा’सारख्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या वर्षानं खूप चांगले अनुभव दिले. मला या सरत्या वर्षानं काय दिलं, असं म्हणण्यापेक्षा मला प्रेक्षकांचं मनोरंजन करता आलं याचा जास्त आनंद आहे. प्रत्येक क्षण मनसोक्त जगणं हाच माझा मंत्र आहे.

– सिद्धार्थ जाधव



Source link

Leave a Reply