अखेर कळलं! राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्राजक्ता माळीची मोठी घोषणा


मुंबई- आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. चाहते तर तिच्या सौंदर्याचं कौतुक करून थकत नाहीत. अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी प्राजक्ता कवयित्रीदेखील आहे. यापूर्वी तिचा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. अशातच प्राजक्ताने आणखी एका गोष्टीत आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आहे. प्राजक्ताने नुकताच तिचा नवा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केला आहे. या ब्रॅण्डचं नाव ‘प्राजक्तराज’ असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅण्डचं अनावरण करण्यात आलं.


प्राजक्ताने आपल्या या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रॅण्डच्या माध्यमातून इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. या ब्रॅण्डमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपरिक दागिने म्हणजे सारा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे अनेक दागिने मिळणार आहेत. मुख्य म्हणजे हे दागिने खरे नसून ते ऑथेंटिक असणार आहेत. म्हणजेच दुसऱ्या धातूवर सोन्याचं पाणी चढवलेले हे दागिने असणार आहेत. लग्नसमारंभासाठी किंवा सणावारासाठी परिधान करायचे महाराष्ट्राच्या मातीतले हे दागिने प्राजक्ताने आपल्या ब्रॅण्डच्या रूपाने समोर आणले आहेत. या दागिन्यांच्या सोन्या, चांदी आणि तांब्याच्या दागिन्यांच्या शृंखलेची नावं आहेत तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा.

Screenshot 2023-01-06 181025

कालातीत झालेल्या दागिन्यांचा ब्रॅण्ड सुरू करण्यामागचं कारणही तिने या कार्यक्रमात सांगितलं. भावाच्या लग्नात इच्छा असूनही आपल्याला पारंपरिक दागिने परिधान करता आले नाहीत याची खंतही तिने व्यक्त करून दाखवली. यासोबतच पुरुषांसाठीही दागिने प्राजक्तराज लवकरच आणणार आहेत. या दागिन्यांच्या शृंखलेची नावं आहेत शिवबा, बळीबा आणि रायबा. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही प्राजक्ताला तिच्या पुढील प्रवासासाठी आशीर्वाद दिला.



Source link

Leave a Reply