कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे दीपिका
शाहरुख खान-दीपिका पादुकोणचा ‘पठाण’ सिनेमा टीझर आल्यापासूनच चर्चेत आहे. ‘पठाण’ सिनेमातील बेशरम रंग गाण्यातून हिंदू धर्मियांची भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने दीपिकाचं नाव पुन्हा एका वादग्रस्त सिनेमाशी जोडलं गेलं. ही पहिलीच वेळ नव्हे की दीपिकाला अशा वादाचा सामना करावा लागला. ‘पद्मावत’, ‘गोलियोंकी लीला रासलीला राम-लीला’, ‘छपाक’ या सिनेमांवेळीही दीपिका विविध कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकली होती. एका सिनेमावेळी तर तिला नाक कापण्याची अन् जीवे मारण्याची धमकीही मिळालेली.
पद्मावत
दीपिकाच्या सर्वात गाजलेल्या सिनेमांपैकी ‘पद्मावत’ हा सिनेमा आहे. मात्र या सिनेमामुळे तिला मोठ्या वादाचा सामना करावा लागलेला. या सिनेमाच्या नावावरुन आधी गदारोळ माजला होता. त्यानंतर तिने या सिनेमात ‘घुमर’ डान्स केल्यानंतर त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. दीपिकाला नाक कापण्याची धमकी मिळालेली, एवढेच नव्हे तिला जीवे मारण्याचीही धमकी मिळाली होती. तिच्या सिनेमाला मोठ्या प्रमाणात करणी सेनेकडून विरोध झालेला. जयपूरमध्ये सिनेमाच्या सेटची तोडफोडही झाली होती.
गोलियों की रासलीला राम-लीला
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका या जोडीचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे ‘गोलियों की रासलीला राम-लीला’. या सिनेमाचे नाव आधी केवळ ‘रामलीला’ असे होते. त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाद झालेला. त्यामुळे दीपवीरच्या या सिनेमाचे नाव बदलून ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ करण्यात आले. या सिनेमातील दीपिका-रणवीर यांच्यातील इंटिमेट सीनही विशेष चर्चेत आले होते. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यात सिनेमा यशस्वी ठरला होता.
बाजीराव-मस्तानी
रणवीर-दीपिकाचा आणखी एक सिनेमा ज्यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. या सिनेमाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप या सिनेमावर झाला होता. सोशल मीडियावर हा सिनेमा बॅन करण्याचीही मागणी झाली. दरम्यान सिनेमा रीलिजनंतर हिट ठरला होता. या सिनेमातील ‘पिंगा’ गाण्याने मोठा वाद निर्माण केलेला, ज्यात काशीबाई (प्रियांका चोप्रा) आणि मस्तानी (दीपिका पादुकोण) एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलेल्या. मराठी संस्कृतीची अवहेलना केल्याचा आरोप या गाण्यावर केला गेला. त्या दोघींनी परिधान केलेली साडीही मराठी संस्कृतीविरोधातील होती, असा आरोप करण्यात आला होता. याशिवाय पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या चित्रणालाही विरोध झाला होता.
कॉकटेल
सैफ अली खान, दीपिका आणि डायना पेंटी स्टारर ‘कॉकटेल’ सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात दीपिका अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली होती. तिचे ‘व्हेरोनिका’ हे पात्र अत्यंत खुल्या विचारांचे दाखवण्यात आले होते. अनेक प्रेक्षकांना हे रुचले नव्हते, शिवाय अनेकांनी तिच्या कपड्यांवरही आक्षेप घेतलेला.
छपाक
‘छपाक’ सिनेमातून दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या एका युवतीची भूमिका साकारली आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक केले, तरी कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना याही सिनेमाने केला. या सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान दीपिका जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असणाऱ्या प्रोटेस्टमध्ये पोहोचली होती. त्यामुळे ‘छपाक’ सिनेमा बॉयकॉटचा शिकार ठरला. दीपिका ‘टुकडे टुकडे गँग’मधील असल्याची गंभीर टीका तिच्यावर झाली होती. या सिनेता अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत होता.